पाचवी ते बारावीचे विद्यार्थी रमले; आता चिमुरड्यांना लागले शाळेचे वेध ! केत्तूर (सोलापूर) : कोरोना महामारीच्या संकटानंतर सुरवातीला इयत्ता आठवी ते बारावी व नंतर इयत्ता पाचवी ते आठवी या वर्गाच्या शाळा राज्यात सर्वत्र सुरू झाल्या आहेत. मोठ्या व प्रदीर्घ सुटीनंतर शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती मात्र पूर्वीसारखीच वाढत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना महामारीच्या संसर्गामुळे गेल्या दहा महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाल्यानंतर 20 नोव्हेंबरपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले तर 27 जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्गही सुरू करण्यात आले. ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वरचेवर वाढत आहे. शाळांमध्ये पटसंख्या वाढू लागल्याने आता एकाच वर्गामध्ये विद्यार्थ्यांची गर्दी वाढू नये यासाठी शाळा दोन शिफ्टमध्ये पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात आली असल्याचे नेताजी सुभाष विद्यालय, केत्तूर (ता. करमाळा) येथील प्राचार्य डी. बी. शिंदे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग हळूहळू सुरळीत होत असले तरी इयत्ता पहिली ते चौथीच्या घरी राहून कंटाळलेल्या चिमुरड्यांनाही आता शाळेचे वेध लागले आहेत. या चिमुरड्यांना आपल्या वर्गातील बालमित्रांना बऱ्याच दिवसांनंतर भेटावयास मिळणार आहे. मात्र पालकांमध्ये याबाबत मात्र अजूनही संभ्रमावस्था दिसून येत आहे. ऑनलाइनमधील त्रुटींमुळे लहान मुलांना शिकवताना ग्रामीण भागात फारसा फायदा झालाच नाही. लहान मुलांना शिक्षक व विद्यार्थी यांचा प्रत्यक्ष संवाद होणे गरजेचे असते, तो गेल्या दहा महिन्यांपासून न झाल्याने विद्यार्थ्यांना मागचे सगळे विसरून गेल्यासारखे झाले आहे. शासनाने 1 मार्चपासून पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. घरातील ताई-दादा शाळेला जाऊ लागल्याने आम्हालाही शाळेत जायचे आहे. गेल्या काही दिवसांपासून घरातच राहिल्याने कंटाळवाणे जीवन झाले आहे, त्यामुळे आता आमची शाळा सुरू होईल व आम्हालाही आपल्या बाल मित्रांबरोबर दंगामस्ती करता येईल, अशी आशा या चिमुरड्यांना मात्र लागून राहिली आहे. आम्हाला आता घरात बसून कंटाळा आलाय. आमचीही शाळा लवकर सुरू व्हावी असे वाटते. ऑनलाइन तासापेक्षा शाळेमध्ये आम्हाला शिकायला आणि खेळायला आवडते. - आरुष नगरे, विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण आणि प्रत्यक्ष शिक्षण यात खूपच तफावत आहे. आपण शिकवलेले विद्यार्थ्यांना कितपत समजले आहे हे लक्षात येत नाही. प्रत्यक्ष अध्यापन करताना विद्यार्थ्यांसोबत सुसंवाद साधता येतो. लवकरात लवकर पहिली ते चौथीचे वर्ग सुरू व्हावेत हीच तळमळ आहे. - प्रिया निकत, प्राथमिक शिक्षिका, केत्तूर मोठ्या व प्रदीर्घ सुटीमध्ये काही विद्यार्थी शिक्षण प्रवाहाच्या बाहेर गेले आहेत. त्यांना प्रवाहात आणणे गरजेचे झाले आहे. शिक्षकांना पहिल्यापासून सुरवात करावी लागणार असल्याने विद्यार्थी व शिक्षकांची कसोटी लागणार आहे. - रेखा शिंदे- साळुंखे, प्राथमिक शिक्षिका, पोफळज कोरोनामुळे उशीर झालेल्या शैक्षणिक वर्षाचा परिणाम आगामी दोन वर्षापर्यंत तरी राहील. तसेच दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्या काहीअंशी कमी कराव्या लागतील, असे दिसत आहे. - विकास काळे, केंद्रप्रमुख, केत्तूर शालेय शिक्षण विभागाकडून आलेल्या नियमाप्रमाणे त्यांची अंमलबजावणी करून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पालक निर्धास्त होऊन शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाठवत असल्याने विद्यार्थ्यांची संख्या जवळजवळ पूर्ववत होऊ लागली आहे. - ए. एम. बागवान, शिक्षक संपादन : श्रीनिवास दुध्याल Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J
Latest news updates
February 01, 2021
0 Comments
via Tajya news Feeds https://ift.tt/2MMczks
Read More